• Thu. Feb 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

  गोंदिया लोककल्याणकारी योजनांचा जागर

लोककल्याणकारी योजनांचा जागर

*तरुणांनी जाणून घेतली त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती*

*जिल्हा प्रशासन आणि माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम*

      गोंदिया, दि.26 : येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या सर्वसाधारण योजनांची तीन दिवसीय चित्रमय मल्टीमिडिया प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. यात तरुणांनी जाणून घेतली त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती. इथे लागलेल्या प्रदर्शनीमध्ये स्वाधार योजनेची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भावली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. आज प्रदर्शनीला एन.एम.डी. कॉलेज व एस.एस.गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनीला पाहण्यासाठी नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे.

 

        तसेच या चित्रमय प्रदर्शनीला जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवथापक विक्की खिराळे यांनी सुध्दा भेट दिली.

        शासनाच्या सर्वसाधारण योजनांच्या एकाच ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वैयक्तिक शेततळे योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अशाप्रकारच्या एकूण 40 योजनांचा या प्रदर्शनीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. शासनाच्या योजनांची ही चित्रमय मल्टीमिडिया प्रदर्शनी अतिशय विश्वसनीय आहे. जिल्हा माहिती कार्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

         शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. परंतु, योजनांच्या माहितीचा अभाव असल्यामुळे सदर योजनांपासून सर्वसामान्य नागरिक वंचित राहतात. या प्रदर्शनीमध्ये योजनेचे स्वरुप, लाभाचे स्वरुप, लाभार्थी पात्रता, अर्ज कुठे करावा, संपर्क कुठे साधावा, अशी प्रत्येक पॅनलवर योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. शासनाच्या विविध योजनांची ही चित्रमय मल्टीमिडीया प्रदर्शनी तरुण पिढीसाठी प्रेरणादायक आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विक्की खिराळे यांनी व्यक्त केली.