हेलस : जगदीश राठोड
मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, हेलस येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दमदार कामगिरी करत १४ वर्षे वयोगटात मुलांचा तसेच मुलींचा संघ तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत हेलस शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, वेग, चपळता आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्धी संघांसमोर आत्मविश्वासाने खेळ करत दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले. मुलांचा आणि मुलींचा दोन्ही संघ प्रथम क्रमांकावर राहिल्याने हेलस शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही आपल्या खेळाची छाप पाडण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
