ग्रीन इंडिया चॅलेंजच्या पर्यावरण पूरक ‘बीज गणेशा’ला सोनपेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद
“मराठवाड्यात ३० लाख झाडे तयार करण्याचा संकल्प; गोदावरी नदीकाठावर देशी वृक्षांची लागवड करणार”
महाराष्ट्र, परभणी:- रमेश मुलगीर
सोनपेठ, ता. १४ : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ‘ग्रीन इंडिया चॅलेंज’च्या ‘बीज गणेशा’ उपक्रमाला सोनपेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत तहसीलदार सुनील कावरखे, पोलिस निरीक्षक अशोक गित्ते, आरोग्याधिकारी डॉ. भारत चव्हाण व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बीज गणेशाच्या पर्यावरणपूरक मूर्ती भेट देण्यात आल्या. तसेच आमदार राजेश विटेकर, नगराध्यक्ष परमेश्वर कदम, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड आणि निसर्ग व वृक्षमित्र महेश जाधव यांनाही बीज गणेशाची मूर्ती भेट देण्यात आली.
ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक जोगिनपल्ली संतोष कुमार यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सोमनाथ नागुरे यांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमात सहकार्य केले आहे. धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बीज गणेशाच्या मूर्तीमध्ये विविध देशी वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर योग्य पद्धतीने त्यातून रोपे तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यानंतरही पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेला जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यात सुमारे ३० लाख झाडे तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. वाढते तापमान, घटती वृक्षसंख्या आणि बदलते पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वृक्षलागवडीला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. असे सुधीर बिंदू यांनी सांगितले.
गोदावरी नदीकाठच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड झाल्यास स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन होण्याबरोबरच नदीकाठचे पर्यावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
