• Tue. Oct 6th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व हरपले! माजी आमदार चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे निधन; पैठणच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रावर शोककळा पैठण | प्रतिनिधी अविनाश गर्डे

ByAshok Mishra

Oct 6, 2026

पैठण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, ज्येष्ठ राजकीय नेते तथा सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पैठण तालुक्यासह मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

चंद्रकांत घोडके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिले. पैठणच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावताना विधानसभा सदस्य म्हणून तालुक्यातील विविध प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली. १९८५ मध्ये ते पैठण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

‘शरद’ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोलाची भूमिका

सहकार क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांची प्रमुख भूमिका होती. सन २००० मध्ये त्यांनी या कारखान्याची स्थापना केली आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून कारखान्याच्या उभारणीसाठी काम केले.

शेतकरी, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले.

अभ्यासू नेतृत्वाची कारकीर्द

पैठण तालुक्यातील विविध विकासात्मक आणि सामाजिक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ नेते म्हणून घोडके यांची कारकीर्द राहिली. राजकारण आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पैठण तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.

चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणच्या सार्वजनिक जीवनातील एक अनुभवी पर्व संपले असून, त्यांच्या कार्याचा ठसा राजकीय आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळ स्मरणात राहील.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968