• Tue. Sep 15th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराने जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात, शेतात मात्र पिके करपली; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट.

ByAshok Mishra

Sep 15, 2026

अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराने जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात, शेतात मात्र पिके करपली; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट.

महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

पाथरी :-जायकवाडी उपविभागाच्या उपअभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या निव्वळ हलगर्जीपणा आणि मनमानी कारभारामुळे कालवा क्रमांक ५९ चे पाणी शेतकऱ्यांऐवजी ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहे. पिकांना थेंबभर पाण्याची गरज असताना पाणी उधळले जात आहे आणि अधिकारी मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

पाथरी तालुक्यात गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हलक्या जमिनीतील खरीप हातचा गेला असून काळ्या जमिनीतील सोयाबीन, कापूस, तूर, ऊस ही पिके शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत बी-५९ या चारीला पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी महिनाभरापासून मागणी लावून धरली होती.

अखेर २९ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या १८ दिवसांपासून सुरुवातीच्या गावांच्याच चाऱ्या सताड उघड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कालव्याचे पाणी चार-चार वेळा शेत भिजवून ओढ्या-नाल्याने वाहून जात आहे.

देवनांद्रा येथून पाणी सुटल्यानंतर रामपुरी, ढालेगाव, पोहेटाकळी, तुरा, गुंज, कानसूर, लिंबा मायनर या चाऱ्या गेल्या १८-२० दिवसांपासून सताड उघड्या आहेत. तर दुसरीकडे वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, वझूर, वांगी, विटा या शेवटच्या गावांच्या शिवारात अजूनही थेंबभर पाणी पोहोचले नाही.

याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, “दोन दिवसात पाणी सोडतो” हे एकच घासलेले उत्तर गेल्या महिनाभरापासून दिले जात आहे. “हे पाणी नियोजनात नाही, आम्ही काही करू शकत नाही” असे बेजबाबदार उत्तर कर्मचारी देतात.

उंटावरून शेळ्या हाकण्याचा कारभार

या उपविभागाचे उपअभियंता मुख्यालयी राहतच नाहीत. त्यांच्याकडे इतर ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे साहेब उंटावरून शेळ्या हाकतात, असा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. कालव्यावर नियुक्त असलेला एकही कर्मचारी प्रत्यक्षात चारीवर हजर नसतो. पाण्याचे समन्यायी वाटप करणे ही त्यांची जबाबदारी असताना ते बेपत्ता असतात.

विशेष म्हणजे अनेक जागरूक शेतकरी स्वतःहून फोन करून “पाणी बंद करा, आमचे क्षेत्र चार वेळा भिजले” असे सांगत असतानाही अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

जर हीच मनमानी अशीच सुरू राहिली तर पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडण-तंटे होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडी प्रशासनाने तात्काळ सतर्कता दाखवून गरज भासल्यास पोलिसांची मदत घेऊन, गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेल्या चाऱ्या बंद करून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

अन्य ख़बरें

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */