अँकर . . वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आधुनिकतेच्या धावपळीत सण-उत्सवांचे स्वरूप बदलत असताना, वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या छोट्याशा गावात मात्र एका कुटुंबाने आपली संस्कृती आणि परंपरा तीन पिढ्यांपासून तितक्याच निष्ठेने जपून ठेवली आहे. ते कुटुंब म्हणजे अल्लीपूरचे गुणवंत काशिनाथ ढगे यांचे कुटुंब.
ढगे कुटुंबात गेल्या तीन पिढ्यांपासून गौरी महालक्ष्मी बसवण्याची परंपरा मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने सुरू आहे. आजच्या पिढीनेही ही परंपरा खंडित होऊ न देता, अधिक उत्साहाने साजरी करण्याचा वसा घेतला आहे.
आजोबांपासून सुरू झालेला भक्तीचा प्रवास
या परंपरेची सुरुवात गुणवंत ढगे यांच्या आजोबांच्या काळापासून झाली. शेती आणि कष्टाच्या जीवनात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी त्यांनी महालक्ष्मीची स्थापना करण्याचा संकल्प केला होता. तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीला माहेरवाशीण म्हणून घरी आणले जाते. वडिलांनी हा वारसा जपला आणि आता तिसऱ्या पिढीतील गुणवंत ढगे हे संपूर्ण कुटुंबासह हा उत्सव साजरा करतात.अडीच दिवस माहेरवाशीणीचा थाट
ढगे यांच्या घरी महालक्ष्मी उत्सव हा केवळ एक धार्मिक विधी नसून एक सोहळाच असतो. उत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच घराची स्वच्छता, सजावट आणि तयारीला सुरुवात होते. गौरी आगमनाच्या दिवशी दोन महालक्ष्मींच्या मूर्तींना नव्या साड्या, पारंपरिक नथ, ठुशी, बांगड्या आणि फुलांच्या माळांनी सजवले जाते. अडीच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विधिवत पूजा, सकाळ-संध्याकाळ आरती, पुरणपोळी, भजे, १६ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो.या अडीच दिवसात घरात माहेरवाशीण आल्याचा आनंद ओसंडून वाहत असतो. नातेवाईक, शेजारी आणि गावातील महिला दर्शनासाठी आणि हळदी-कुंकवासाठी मोठ्या संख्येने येतात.गावासाठी ठरतेय प्रेरणा आज अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आणि जुन्या परंपरा लोप पावत आहेत. अशा वेळी ढगे कुटुंबाने तीन पिढ्यांपासून एकाच श्रद्धेने हा उत्सव जपणे हे संपूर्ण अल्लीपूर गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“आमच्यासाठी ही फक्त परंपरा नाही, तर आमच्या घराचे संस्कार आहेत. आजोबांनी लावलेला भक्तीचा हा दिवा पुढच्या पिढीपर्यंत असाच तेवत ठेवायचा आहे,” अशी भावना गुणवंत काशिनाथ ढगे यांनी व्यक्त केली.
ढगे कुटुंबाची ही अखंड परंपरा केवळ महालक्ष्मी पूजेपुरती मर्यादित नसून, पुढच्या पिढीला आपल्या मुळाशी जोडून ठेवण्याचा एक सुंदर संदेश देत आहे.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
बाईट . . अंकित ढगे ग्रामस्थ
