“हायवा फसल्यानंतर बाजूने मार्ग काढताना बस घसरली; मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग ५४८ बीवरील परळी ते सोनपेठ मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली असून, सोनपेठ ते डीघोळपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावल्यानंतर या खराब रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
बस खपाट पिंपरी पाटीजवळून जात असताना अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीचा हायवा यापूर्वीच रस्त्याच्या खराब भागात फसला होता. त्यामुळे बाजूने वाहतूक काढण्याचा प्रयत्न सुरू असताना परळी–सोनपेठ मार्गावरील बसही रस्त्याच्या कडेला घसरून फसली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
सध्या लहान वाहने कशीबशी बाजूने ये-जा करू शकत असली, तरी हायवा आणि बस ही दोन्ही मोठी वाहने बाहेर काढल्यानंतरच मोठ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जवळपास एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने आधीच खराब झालेल्या रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. बाजूने वाहन काढताना वाहने फसण्याचे प्रकार वाढले असून, अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.
परळी–सोनपेठ हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात एसटी बस, मालवाहतूक करणारी वाहने तसेच लहान-मोठी खासगी वाहने धावतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे काही काळ परळी–सोनपेठ बससेवाही बंद करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
सोनपेठ ते डीघोळ रस्ता कधी होणार?
सोनपेठ ते डीघोळपर्यंतच्या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरेसे लक्ष नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व नेत्यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यास रस्त्याचे काम लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच पाथरी ते सोनपेठ याही रस्त्याची हीच अवस्था आहे आपण रस्ता कधी होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे
