देसाईगंज:—— ब्रह्मपुरी–कोरची मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ च्या रस्ते मजबुतीकरण व बीटी नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे.
मार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याच्या कामाची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला मंजुरी मिळाली आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ अंतर्गत होणाऱ्या या कामाची एकूण लांबी ५७.९३ किलोमीटर आहे. अंदाजित कामाची किंमत ४५ कोटी ५६ लाख आहे. रस्त्याच्या विविध टप्प्यांमध्ये मजबुतीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी बीटी नूतनीकरण करण्यात येणार आहे.
या कामामुळे कोरची, कुरखेडा, वडसा आणि ब्रह्मपुरी या भागांदरम्यानची वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. कामाच्या ठिकाणी पाहणीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता केळकर यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी कामाचा दर्जा चांगला राखण्याबरोबरच काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या महत्त्वपूर्ण कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आभार मानले.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिक, वाहनधारक व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
————————-
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी
