अर्णव बुवांच्या दमदार गायकीने रसिक मंत्रमुग्ध; शुद्ध कल्याण, केदार ते भैरवीपर्यंत सुरांची सुरेल सफर”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
दि. २१ :
‘रसिकराज’ म्हणून गौरविले गेलेले ज्येष्ठ संगीतप्रेमी वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित संगीत मैफलीत कोल्हापूरचे युवा गायक अर्णव बुवा यांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण गायकीने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या मैफलीत शास्त्रीय संगीताच्या विविध रंगांची अनुभूती रसिकांना मिळाली.
वसंत पाटील कलामंच व अभिव्यक्ती कट्टा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात अर्णव बुवांनी ‘शुद्ध कल्याण’ रागाने केली. अर्णव बुवांनी ‘बोलन लागी पपीहा’ या विलंबित ख्यालातून दमदार आलापी सादर केली. तारसप्तकातील सहज भ्रमंती, सुरेल बहेलावे आणि त्यानंतरच्या तानक्रियेने मैफलीची रंगत वाढवत नेली.
यानंतर सादर केलेला ‘केदार’ राग रसिकांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला. स्वरांना आंदोलित करण्याचे अर्णव बुवांचे तंत्र आणि रागविस्तारातील सहजता विशेष जाणवली. ‘चतुर सुघर बैय्या तुम’ या तराण्यात तालांगाशी खेळत घेतलेल्या सुरेल तानांनी रसिकांची दाद मिळवली.
रसिकांच्या फर्माईशीवरून त्यांनी संत पुरंदरदासांचे कानडी भजन सादर केले. माऊली पाथ्रीकर यांच्या मृदंगसाथीने या सादरीकरणाला विशेष रंगत आली. त्यानंतर ‘संगीत एकच प्याला’ नाटकातील ‘सत्य वदे वचनाला नाथा’ हे नाट्यपद त्यांनी भावपूर्णतेने सादर केले. तबलावादक प्रशांत गाजरे यांनी मुखडा संपताना लावलेली लग्गी विशेष दाद घेऊन गेली.
मैफलीचा समारोप ‘देवा आदिदेवा पांडुरंगा’ या भैरवीने झाला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
मैफलीस मंगेश जवळेकर यांनी हार्मोनियमची संयत साथ, प्रशांत गाजरे यांनी तबला, तर प्रमोद अंधारे व नरेंद्र जोशी यांनी तानपुऱ्याची साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम श्रीरामवार यांनी केले. कलाकारांचा परिचय अनुष्का पुराणिक यांनी करून दिला, तर आभार उषाताई पाटील कुर्डूकर यांनी मानले.
यावेळी डॉ. संध्याताई दुधगावकर, हेमंत जामकर, श्रीकांत उमरीकर, न. चि. जाधव, रमेश शर्मा, पाटील मामी, माधवबुवा आजेगावकर, आदी संगीतप्रेमींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. रविशंकर झिंगरे, श्रीनिवास कुर्डूकर, किशोर पुराणिक, रवी पुराणिक, रेणूकादास रत्नपारखे, उपेंद्र दुधगावकर, विश्राम परळीकर आदींनी सहकार्य केले.
