• Sat. Sep 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

‘वाचन चळवळ’ ही उपक्रम न राहता संस्कृती बनावी – विनोद शेंडगे

ByAshok Mishra

Sep 26, 2026

पीएमश्री जि.प.कें.प्रा.शाळा कन्या सोनपेठ येथे विद्यार्थ्यांशी सुसंवाद”

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) परभणी मार्फत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा समन्वयक श्री. विनोद शेंडगे मुख्य प्रवर्तक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र यांनी आज सकाळी सोनपेठ तालुक्यातील पीएमश्री जि. प. कें. प्रा. शाळा कन्या सोनपेठ येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांशी बोलताना शेंडगे सर म्हणाले, माणसाला जीवन जगत असताना काहीतरी आवड असावी, तरच तो त्यासाठी सवड काढतो. आवडीचे काम करताना कंटाळा येत नाही. वाचन हा केवळ उपक्रम म्हणून न राबवता तो एक संस्कृती बनावा. कोणतेही कंटाळवाणे भाषण न देता शेंडगे सर मुलांमध्ये मिसळले आणि अगदी सोप्या शब्दांत वाचनाचे महत्त्व विशद केले. वाचन हा एकच धागा विद्यार्थी आणि शेंडगे सर यांना जोडणारा ठरला. या धाग्याने शब्दांची वीण विणताना ४५ मिनिटे कशी संपली हे विद्यार्थ्यांना कळलेच नाही. संवादा दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले आणि सरांकडून पुस्तके बक्षीस म्हणून मिळवली. शिक्षण हेच आमच्या उद्धाराचे आणि प्रगतीचे एकमेव साधन आहे. वाचनानेच चांगली व्यक्तिमत्त्वे घडतात. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे अशा आशयाने सरांनी विद्यार्थ्यांना वाचनाची मेजवानी दिली. महाराष्ट्र भर सायकलवरून जवळपास ७००० किमी प्रवास करून श्री. विनोद शेंडगे हे ‘अक्षर आनंद’ मार्फत वाचन चळवळ राबवत आहेत. या अवलिया व्यक्तिमत्वाने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वेळ दिला, ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन प्रेरणेची नवी पेरणी ठरली, असे शिक्षकांनी सांगितले. संवादा नंतर शेंडगे सरांनी वर्गनिहाय भेटी देऊन विद्यार्थी वाचकांची पुस्तक वाचन आणि नोंद वही यांची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या वाचनाचे कौतुक करून त्यांनी शाळेचा निरोप घेतला. यावेळी शाळेतर्फे मुख्याध्यापक श्री. आर. एस. यादव व शिक्षकवृंद यांनी पुस्तके देऊन शेंडगे सरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. के. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. ज्ञानेश्वर झिनेवाड यांनी केले

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968