कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची SUICIDE
“सारंगपूर येथील घटना; शेतीच्या कर्जाची चिंता सतावत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे”
मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी बन्सी आश्रोबा चोखट (वय ५५ वर्षे) यांनी कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री घडली. या घटनेमुळे सारंगपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बन्सी चोखट यांच्यावर शेतीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक, मानवत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, मंगरूळ या दोन्ही बँकांचे कर्ज होते. शेतीचे कर्ज वाढल्याने ते सतत चिंतेत व तणावात राहत होते. “बँकेचे कर्ज झाले आहे, मी ते कसे फेडू?” अशी चिंता ते कुटुंबीयांजवळ व्यक्त करीत होते. तसेच “मला जगावेसे वाटत नाही,” असेही ते कुटुंबीयांना बोलून दाखवत होते. कुटुंबीय त्यांची समजूत काढून काळजी करू नका, मनात असे विचार आणू नका, असे सांगत होते.

दरम्यान, दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास बन्सी चोखट हे घरातून शेताकडे गेले. शेतातून त्यांनी त्यांचा मुलगा पांडुरंग यास फोन करून, “मला शेतीचे खूप कर्ज झाले आहे. ते मी फेडू शकत नाही. मी औषध पिऊन जीव देत आहे,” असे सांगितले.
पांडुरंग याने तातडीने ही माहिती आपला चुलत भाऊ अनिल यास दिली. माहिती मिळताच अनिल ज्ञानोबा चोखट, त्यांचा लहान भाऊ गोविंद ज्ञानोबा चोखट व चुलत भाऊ माणिक संदीपान चोखट यांनी शेताकडे धाव घेतली.
शेतात पोहोचल्यानंतर बन्सी चोखट हे चिंचेच्या झाडाखाली पडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांच्या शेजारी विषारी औषधाचे डबेही पडलेले होते. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मोटारसायकलवरून गावात आणले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, मानवत येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मानवत पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाळवदे हे करीत आहेत.
कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे सारंगपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चोखट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
