गोंदिया अनेक महिला नववारी घालुन चालविणार सायकल…..
गोंदिया:- गोंदिया येथील ‘सायकलिंग संडें ग्रुपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सायकल रॅली मध्ये काही महिला ह्या नववारी घालुन सायकल चालविणार आहेत हे या सायकल रॅलीचा आकर्षण ठरणार आहे, तसेच या सायकल रॅलीमध्ये गोंदिया शहरातील शेकडोंच्या संख्येने गृहिणींसह शासकीय, निमशासकीय महिला कर्मचारी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या सायकल रॅलीत प्रामुख्याने महिला अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. महिलाचे व इतर लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी, त्यातून पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी गोंदियातील काही युवक व युवतींनी मिळून २०१७ यावर्षी ‘सायकलींग संडें ग्रुपची स्थापना केली. ग्रुपच्या माध्यमातून दर रविवारी किमान १५ ते २० कि.मी. सायकल चालविण्यात येते. दरम्यान, महिलांसाठी काहीतरी वेगळे करता यावे यासाठी ग्रुपच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, ८ मार्चला महिला दिनानिमित्त शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथून या सायकल रॅलीला सुरुवात होणार असून आंबेडकर चौक, बाजपेयी ड्रायव्हिंग स्कुल, हनुमान मंदिर, इंगळे चौक, रेल्वे कॉलनी काली मंदिर, श्री टॉकीज चौक, रेल्वे स्टेशन, दुर्गा चौक, यादव चौक, सिद्धी कॉलनी शंकर चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, या परिसरात भ्रमण करून इंदिरा गांधी स्टेडिअम येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. विशेषतः या रॅलीत शेकडोंच्या संख्येने शाळकरी मुलींसह महाविद्यालयील विद्यार्थिनी, गृहिणीं, महिला डॉक्टर, पोलिस, वकील, शिक्षिका आदी महिला कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार आहेत.

