मानवत/प्रतिनिधी दि. १६ :
मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके अक्षरशः जळून खाक झाली आहेत. सोयाबीन, कापूस, मूग यांसह सर्वच पिके करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, जगणे मुश्किल झाले आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता मानवत तालुक्यातील किन्नर समाज मैदानात उतरला आहे.
किन्नर समाजाच्या गौरी देवकर, किरण देवकर, चांदणी देवकर, अक्षिनी देवकर, शबनम देवकर यांनी आज, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदार, तहसील कार्यालय, मानवत यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून मानवत तालुक्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यामुळे शेतातील पिकांसोबतच शेतकऱ्यांचे जीवनही जळून खाक झाले आहे. पिके गेल्याने रोजचा उदरनिर्वाह करणे, मुलांची शाळेची फी भरणे अवघड झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तात्काळ मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ७० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी किन्नर समाजाने केली आहे.
दरम्यान, या मागणीची शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा किन्नर बांधवांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच वेगळ्या भूमिकेत दिसणाऱ्या किन्नर समाजाने यावेळी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याने मानवत तालुक्यात या निवेदनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
