• Thu. Sep 17th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जालना : जगदीश राठोड ऋषिपंचमीनिमित्त निळकंठेश्वरात संतसंमेलन; संतपूजनासह भाविकांना धर्ममार्गाचे मार्गदर्शन

ByAshok Mishra

Sep 17, 2026

मंठा तालुक्यातील श्रीक्षेत्र निळकंठेश्वर देवस्थान, पिंपरखेडा येथे ऋषिपंचमीनिमित्त भव्य संतसंमेलन, संतपूजन व प्रवचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी देशभरातून संत-महंत तसेच राज्यभरातील शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यामुळे देवस्थान परिसराला धार्मिक वातावरणाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मठाधिपती अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर आचार्य स्वामी कृष्णचैतन्य पुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संतसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित संतांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर देवस्थानच्या वतीने विश्वस्तांनी उपस्थित संत-महंतांचे संतपूजन व सन्मान केला.
यावेळी विविध संत-महंतांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित भाविकांना धर्म, संस्कार आणि आध्यात्मिक जीवनाविषयी मार्गदर्शन केले. आचार्य स्वामी कृष्णचैतन्य पुरी महाराज यांनी मार्गदर्शन करताना, “आपली आपण करा सोडवण” या उक्तीचा संदर्भ देत मानवी जन्माचे महत्त्व सांगितले. ईश्वराने दिलेला हा देह ही मोठी संपत्ती असून प्रत्येकाने धर्माविषयी आदराची भावना मनात ठेवावी. दररोज थोडा वेळ काढून ज्ञानेश्वरी, गाथा, गुरूचरित्र यांसारख्या ग्रंथांचे आपल्या आवडीनुसार वाचन करून ज्ञान व संस्कार आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
आचार्य कृष्णचैतन्य पुरी महाराजांचा भव्य सत्कार
दरम्यान, श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान, पिंपरखेडा येथील मठाधिपती आचार्य स्वामी कृष्णचैतन्य पुरी महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
महाराजांच्या दीर्घकालीन संस्कृत सेवेला महाराष्ट्र शासनाने दिलेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि प्राचीन ज्ञानपरंपरेचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी सभापती तथा उद्योजक किसनराव मोरे यांनी सहपरिवार आचार्य कृष्णचैतन्य पुरी महाराजांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
ऋषिपंचमीनिमित्त आयोजित या संतसंमेलनामुळे निळकंठेश्वर देवस्थान परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. राज्यभरातून आलेल्या शिष्य परिवार व भाविकांनी संतांचे आशीर्वाद घेत प्रवचनाचा लाभ घेतला.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968

/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */