• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

जन्मभूमी फाऊंडेशनच्या लोकसभागातील सांडवा खोलीकरणामुळे सात वर्षांपासून वाघाळकरांची तहान भागते;’वाघेश्वर बंधारा’ ठरतोय वरदान

ByAshok Mishra

Sep 21, 2026

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

पाथरी : – दुष्काळ ही मराठवाड्याची ओळख… पण जिद्द असेल तर दुष्काळावरही मात करता येते, हेच सिद्ध करून दाखवले आहे पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ग्रामस्थांनी आणि जन्मभूमी फाऊंडेशनने.
पाथरी तालुक्याला जायकवाडीचे वरदान लाभले असले तरी वाघाळा येथील मुख्य कालव्याच्या सांडव्यामध्ये प्रचंड गाळ आणि काटेरी झाडे वाढल्याने तो पूर्णपणे निकामी झाला होता. २०१४ पासून सलग चार वर्षे मराठवाडा तीव्र पाणी टंचाईने होरपळत असतानाच या सांडव्याचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना जन्मभूमी फाऊंडेशनने मांडली.
शासनाच्या एक रुपया शिवाय उभारले जलमंदिर
फाऊंडेशनने शेतकरी आणि जाणकार ग्रामस्थांशी चर्चा करून तत्कालीन जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांची भेट घेतली. शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय, केवळ लोकसहभागातून हे काम करण्याचा निर्धार व्यक्त करत उत्खनन परवान्यासाठी अर्ज केला. डिसेंबर २०१८ मध्ये महसूल विभागाची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने जलक्रांतीला सुरुवात झाली.
पाथरीचे उपविभागिय अधिकारी यांच्या हस्ते प्रारंभ करून सलग ६२ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन, तब्बल ५२५ मीटर लांब, ३० ते ४० फूट रुंद आणि १० ते १५ फूट खोल सांडव्याचे खोलीकरण करण्यात आले. बंधा-या लगत शेती असलेले शेतकरी सुशील घुंबरे, कार्तिक घुंबरे यांना शेती साठी पाणी देण्याच्या अटीवर त्यांच्या मोठ्या अर्थसहाय्यातून २८ फूट रुंद आणि ४५ फूट खोल पुनर्भरण विहीर (रिचार्ज शॉफ्ट) तयार करून त्यात १६०० फूट आडवे सार घेण्यात आले.या मुळे परिसरातील विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होत आहे.अजूनही या सांडव्याचे ३० टक्के काम बाकी आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा गवळताई नागमोडे यांनी जिल्हा परिषद निधीतून सिमेंट बंधारा बांधला. दोन वर्षांपूर्वी रिलायन्स कंपनीने सामाजिक जाणिवेतून या बंधाऱ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून दिल्याने त्याची साठवण क्षमता कित्येक पटीने वाढली आहे.
सात वर्षांपासून अविरत जलसेवा
या दूरदृष्टी असलेल्या कामामुळेच आज गेली सात वर्षे जायकवाडी धरणाच्या कालव्याला पाणी येताच, जन्मभूमी फाऊंडेशनने उभारलेल्या बंधाऱ्यातून विना अडथळा पाणी थेट सिमेंट बंधाऱ्यात येते. यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान तर भागतेच, शिवाय शेतीसाठीही या पाण्याचा मोठा उपयोग होतो.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने हा बंधारा कोरडा पडला होता. नुकतेच जायकवाडीचे आवर्तन ग्रामस्थांच्या प्रयत्नातून आले असतानाच पाऊसही झाला. या संधीचा लाभ घेत शेतकरी दत्तराव लोणीकर, कार्तिक घुंबरे यांच्या पुढाकारातून जन्मभूमी फाऊंडेशनने खोलीकरण केलेल्या सांडव्याद्वारे पाणी आणून ग्रामस्थांनी ‘वाघेश्वर बंधारा’ असे नामकरण केलेल्या या तलावात जमा केले.
शनिवारी पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी (कृषी) तथा वाघाळा ग्रामपंचायतीचे प्रशासक संदीपान घुंबरेआणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. कैलास जाधव यांनी या तलावाला भेट देऊन पाहणी केली व पाणी प्रश्न काही अंशी सुटल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.
थेंबाथेंबातून तळे साचते आणि लोकसहभागातून गावाचे भाग्य बदलते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाघाळ्याचा हा वाघेश्वर बंधारा.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968