देवरी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पालांदूर ज.ता येथील विद्यार्थांनी कबड्डी क्रीडा प्रकारात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केले. दि. १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी देवरी येथील क्रिडांगणात तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थांनी खेळातील कौशल्य, उत्तम समन्वय आणि सांघिक भावना यांचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, विद्यार्थिनींच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक मासरकर सर यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करावी, यासाठी आवश्यक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कबड्डी संघाच्या यशस्वीतेकरिता संघाचे प्रशिक्षक पी.पी. कोरोंडे व कु. श्वेताराणी साठवणे यांनी जबाबदारी पार पाडली. तर संघ व्यवस्थापक म्हणून पी.डी. डोंगरे व आर.ए. झाडे यांनी काम पाहिले. विजयी चमूमध्ये अजित ताडामी (संघनायक), अनुज उईके, हिमेश मडावी, गौरव वरटी, गौरव कोल्हे, ललीत कुंभरे, जयकुमार राऊत, नैतिक पोरेटी, आर्यन गावळ यांचा समावेश आहे.
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
