मंठा :
जगदीश राठोड़
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी. प. उच्च प्राथमिक शाळा, हेलस येथील १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या तसेच मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. दोन्ही संघांनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले असून, आता त्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेदरम्यान हेलसच्या खेळाडूंनी मैदानावर वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि सांघिक भावना यांचा सुरेख मेळ साधत प्रतिस्पर्धी संघांसमोर आपले वर्चस्व निर्माण केले. मुलांच्या संघाने तसेच मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळ करत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. दोन्ही संघांचे हे यश शाळेसाठी तसेच हेलस गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
खेळाडूंनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मेहनतीला स्पर्धेत यशाचे फलित मिळाले. मुलं आणि मुली दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवल्याने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशासाठी मुख्याध्यापक कुडे सर, श्री. खनके सर, श्री. जामदार सर, श्री. गडधे सर, श्री. बुधवंत सर, श्री. आघाव सर, श्री. खणपटे सर, श्रीमती सत्वशिला मॅडम, श्रीमती गायकवाड मॅडम, श्रीमती कोकाटे मॅडम, श्री. जोशी सर तसेच मार्गदर्शक श्री. राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश साध्य झाले.
हेलसच्या खो-खोपटूंनी तालुका गाजवला! मुलं-मुली दोन्ही संघांची विजयी धाव; प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरीय स्पर्धेत दिमाखदार प्रवेश
