अँकर . . वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टा. वायगाव ते हिंगणघाट महामार्गावरील तळेगाव टा. येथील पुलाजवळील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात असतानाही दुरुस्ती होत नसल्याने अखेर तळेगाव टा. येथील राहुल सुरकार मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला. आज मित्र परिवाराच्या वतीने श्रमदान करून रस्त्यावरील सर्व खड्डे माती, गिट्टी आणि सिमेंटच्या सहाय्याने बुजविण्यात आले.
या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी राहुल सुरकार मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
मात्र हा तात्पुरता उपाय असून या महामार्गाची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करणे गरजेचे आहे. बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा
