• Sat. May 30th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

बांबेझरी-कुसुंबी प्रकरणात तोडगा काढण्यासाठी

ByAshok Mishra

Apr 14, 2026

बांबेझरी-कुसुंबी प्रकरणात तोडगा काढण्यासाठी

शासन प्रशासन सकारात्मक : पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

Ø रुग्णालयात जावून विषबाधित शेतक-यांची आस्थेने विचारपूस

चंद्रपूर, दि. 14 : बांबेझरी व कुसुंबी येथील शेतक-यांच्या जमिनीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

 

 

सोमवारी जमिनीच्या प्रश्नावर विष प्राशन करणा-या शेतक-यांची आज (दि. 14) पालकमंत्री डॉ. वुईके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. शासन आणि प्रशासन कोणालाही    वा-यावर सोडणार नाही. राज्य सरकार शेतक-यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा) व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.

बांबेझरी आणि कुसुंबी येथील जमिनीच्या प्रश्नाबाबत शेतक-यांना न्याय मिळवून देण्याची शासनाची भुमिका आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, घडलेली घटना दुर्देवी आहे. यावर नक्कीच तोडगा काढला जाईल. पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकारी स्वत: जिवती येथे येऊन या प्रश्नावर शेतक-यांशी सकारात्मक चर्चा करतील.

जीव हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. येथे भरती विषबाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे आम्हा सर्वांचे लक्ष आहे. चांगले उपचार करण्याच्या सुचना सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत. तसेच सुट्टी झाल्यावर सर्व रुग्णांना रुग्णालयाच्या वाहनाने घरी पोहचवून देण्याचेही निर्देश दिले आहे, असे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी, रुग्णालयात भरती जंगू पेंदोर, मारुती तलांडे, जयराम कुडमेथे, बाळू सिडाम, लच्छु आत्राम या रुग्णांशी तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांच्या समस्याही ऐकूण घेतल्या.

 जिल्हा प्रशासनाची सकारात्मक भूमिका : अल्ट्राटेक सिमेंट (माणिकगड सिमेंट) कंपनीला मौजा कुसुंबी व परिसरातील 643.62 हेक्टर क्षेत्रावर चुनखडक उत्खननासाठी शासनाने दिलेल्या परवानगीचा कालावधी 2031 पर्यंत वाढविण्यात आला आहे. यापैकी 63.62 हेक्टर खाजगी जमिनीबाबत 24 आदिवासी कास्तकारांना मोबदला देण्यात आलेला असून त्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बांबेझरी येथील जमिनीबाबत करण्यात आलेल्या मोजणीत संबंधित सर्वे क्रमांक 43,44,45,46,47,48 मध्ये कंपनीकडून कोणतेही उत्खनन झाले नसल्याचा अहवाल भूमी अभिलेख विभागाने दिला आहे. तसेच संबंधित क्षेत्र हे राखीव वनक्षेत्रात येत असून शेतीयोग्य नसल्याचे वन विभागानेही नमूद केले आहे.

या प्रकरणी प्रशासनाने 25 सप्टेंबर 2024, 4 डिसेंबर 2024 रोजी उपविभागीय स्तरावर तर 17 ऑक्टोबर 2025 रोजी अपर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन बांबेझरी येथील जमीन मोजणी संदर्भात बैठका घेऊन शेतक-यांशी संवाद साधला. सदर प्रकरण सध्या दिवाणी न्यायालय, चंद्रपूर येथे प्रलंबित असून न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे. तसेच राज्य मानवी हक्क आयोगासमोरही हे प्रकरण विचाराधीन आहे. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने प्रशासकीय मर्यादा असल्या तरी शेतक-यांच्या न्याय्य हक्कासाठी शासन – प्रशासन कायदेशीर चौकटीत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच न्यायालय जो निर्णय देईल, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

०००००००

वृत्त क्र.  199

पालकमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौर संगिता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला पालकमंत्री डॉ. वुईके यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आजचा दिवस केवळ जयंती उत्सव नाही तर डॉ. आंबेडकरांचा संघर्ष तसेच त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. भारतीय संविधानामुळेच सर्व नागरिकांना समान हक्क, न्याय, समता, बंधुता यांच्यासोबतच मुलभुत अधिकार आणि कर्तव्ये मिळाली आहेत. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज मी येथे आपल्यासमोर उभा आहे. राज्य शासनाने आरक्षण वर्गीकरणाचा विषय जनतेच्या चर्चेसाठी ठेवला असून त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर नक्कीच सकारात्मक निर्णय शासन घेईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जयंती केवळ एक दिवस नाही तर 365 दिवस  योग्य कृती करणे, हे डॉ. आंबेडकर यांना खरे अभिवादन राहील. त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने स्मरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तुला स्मारक बनविण्याचे सौभाग्य मला मिळाले. चंद्रपूर हा डॉ. आंबेडकरांच्या विचारावर उत्तम काम करणारा जिल्हा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, 140 कोटीच्या जनतेला संविधानाने एकसंघ ठेवले आहे. आज मानवतेचा संकल्प करण्याचा दिवस आहे. येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून यापैकी 57 कोटी मंजूर झाले आहे. उर्वरीत निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी महापौर संगिता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, माजी मंत्री हंसराज अहीर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968