• Sun. Apr 26th, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

Maharashtra‘आयसीएसएफटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; शाश्वत तंत्रज्ञानावर मंथन

ByNews Editor

Apr 26, 2026 #maharashtra

‘आयसीएसएफटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; शाश्वत तंत्रज्ञानावर मंथन
पुणे : मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर येथे ‘ आयसीएसएफटी – २०२६ ’ (International Conference on Sustainable and Futuristic Technologies) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले. शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरावर आधारित या परिषदेत देश-विदेशातील संशोधक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग नोंदविण्यात आला.
आयईईई पुणे सेक्शनच्या सहकार्याने आयोजित परिषद आयएमईआरटी सेमिनार हॉलमध्ये पार पडली. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अभय जेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. कार्ल डेबोनो (माल्टा), प्रा. योहान्स कुर्नियावा (इंडोनेशिया), संस्थेचे अध्यक्ष बी. जी. जाधव, आयईईई पुणे सेक्शनचे प्रमुख डॉ. अमर बुचडे, प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्य स्वाती देशमुख, परिषदेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना ठाकरे आदी उपस्थित होते.
परिषदेदरम्यान ३३१ संशोधन सादरीकरणे, विविध तांत्रिक सत्रे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रॉम्प्ट टू प्रॉडक्ट’ या विषयावर विशेष चर्चासत्र घेण्यात आले. तसेच सस्टेनाबिलिटी सेल (SDG)चे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संशोधन सादर करण्याची संधी उपलब्ध होणार असून नवसंशोधनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नवे प्रश्न सोडविणारी शिक्षण पद्धती आवश्यक : डॉ. अभय जेरे
प्रमुख पाहुणे डॉ. अभय जेरे म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. भविष्यात शिक्षण आवश्यक राहील; मात्र पारंपरिक शिक्षण संस्थांची भूमिका बदलू शकते. शिक्षण पद्धतीने नव्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित शिक्षणाची गरज वाढणार आहे.”
डॉ.अमर बुचडे यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला जोडण्याचा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. बी. जी. जाधव यांनीही बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृणाल कोठारे यांनी केले, तर आभार प्रा. गिरिजा चिद्दरवार यांनी मानले.

अन्य ख़बरें