• Mon. Sep 21st, 2026

Chanakya News India

News Broadcast Live TV

अँकर . . अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची महसूल कार्यालयांना भेटी व पाहणी Ø सेवाग्राम मंडळ व तलाठी कार्यालयाची तपासणी Ø समुद्रपुर येथे तहसिल, सहनिबंधक कार्यालयास भेट करंजी भोगे येथे शेतकऱ्यांसोबत पिक पाहणीचे प्रात्यक्षिक

ByAshok Mishra

Sep 21, 2026

स्लग . . वर्धा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. महसूल विभाग गेल्या काही वर्षात अधिक लोकाभिमुख, गतिमान झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदलत्या काळात आपल्या भूमिका समजून घेत लोककल्याणासाठी कामे केली पाहिजे, असे ठिकठिकाणी भेटीप्रसंगी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, आकाश अवतारे, विश्वास सिरसाठ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, सहजिल्हा निबंधक के.एस.कांबळे तसेच महसूल, भूमि अभिलेख, नोंदणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी सेवाग्राम येथे महसूल मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. सेवाग्राम मंडळांतर्गत कामकाजाचा आढावा घेतला.
समुद्रपुर येथे तहसिल कार्यालयास भेट देऊन तेथील तलाठी आस्थापना, संजय गांधी निराधार अनुदान विभागास भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच संजय गांधी योजनेच्या एका महिला लाभार्थ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधत त्यांना योजनेचा नियमित लाभ मिळतो की नाही याबाबत माहिती घेतली. महसूल कार्यालयात येणारा सर्वसामान्य नागरिक आपले काम झाल्याचे समाधान घेऊन गेला पाहिजे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकास सन्मानाची वागणूक द्या, त्यांच्याशी आत्मियतेने संवाध साधन्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
समुद्रपुर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन मुद्रांक नोंदणीचा आढावा घेतला. मुद्रांक नोंदणीची 9 पैकी 6 कार्यालये शासकीय तर इतर खाजगी जागेत आहेत. काही ठिकाणी सुरु असलेल्या या विभागाच्या इमारत बांधकामासाठी निधी तसेच खंडीत वीज पुरवठ्यामुळे कामकाज बंद पडू नये, यासाठी ईन्व्हर्टर देण्याचे निर्देश त्यांनी दुरध्वनी वरून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर वर्धा तालुक्यातील करंजी भोगे येथे शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष ई-पिक पाहणीचे प्रात्यक्षिक केले व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
त्यानंतर वर्धा येथील जिल्हा ग्रंथालयाला भेट दिली. ग्रंथालयात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपले ध्येय आणि दिशा निश्चित असली पाहिजे. योग्य दिशेने केलेली मेहनत निश्चितपणे यश मिळवून देते, असे श्री.खारगे म्हणाले. जिल्हा ग्रंथालयाची पाहणी व ग्रंथालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. वर्धा शहरातील उपजिल्हा भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी वॉर रुमला भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली.
सेवाग्राम येथील बापू कुटीस भेट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या बापूंच्या सेवाग्राम येथील आश्रमास श्री.खारगे यांनी भेट दिली. सेवाग्राम आश्रमातील बापूंचे पहिले निवासस्थान, कस्तुरबा गांधी यांचे ‘बा’ निवास, बापू कुटी तसेच बापूंचे तत्कालिन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे विजय तांबे यांनी आश्रमाची माहिती दिली. तसेच नोंदवहीत अभिप्राय नोंदविला. ‘‘इथल्या परिसरात आल्यानंतर विलक्षण साधेपणातील ताकद लक्षात आली. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ ही म्हण कदाचित इथूनच उदयास आली असावी. इथल्या परिसरात भेट व महात्मा गांधीजींच्या वस्तू व त्यांचे विचार यातून नविन उर्जा घेऊन बाहेर पडत असल्याचे समाधान आहे’’, असे आपल्या अभिप्रायात त्यांनी नोंदविले.
प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

By Ashok Mishra

Ashok Mishra is the Editor-in-Chief of Chanakya News India, a Hindi digital news platform established in 2012. The organization focuses on delivering verified breaking news, live news coverage, crime, entertainment, business, technology, and regional updates across India. Address: FNG vihar 2 sector 121 Gautam budhnagar Uttar pradesh, India Email -mpcgchanakyanewsindia@gmail.com Phone– +91 9315744968