महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून आज 21 सप्टेंबर रोजी तीन तास रस्ता रोको करण्यात आला तीन तास वाहतूक टप्पू वाहनांच्या रांगाच रांगा मानवत तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर राधाकिशन ढगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने मानवत तहसीलदार यांना दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात मानवत तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने जवळपास महिनाभर खंड दिल्याने खरीप पिके वाळून जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील खरीप हंगामातही पेरणी होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने मानवत तालुक्यातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी.
हळद पिकाचा विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.
मागील हंगामातील उसाचा ३०० रुपयांचा हप्ता साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावा.
जयकवाडी धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी परभणी जिल्ह्यासाठी कालव्यातून तात्काळ सोडण्यात यावे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. यामध्ये खासगी शाळांचाही समावेश करावा.
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर किशोर राधाकिशन ढगे, रामप्रसाद गमे, विठ्ठल चौखट, नामदेव काटे, रणजीत चव्हाण, दत्ता परांडे, किशन शिंदे, पी.टी. निर्वळ, मुंजाभाऊ लोढे, गोविंद घांडगे, माऊली चांगभले, माऊली शिंदे, लक्ष्मण शिंदे, विकास जोगदंड, उत्तम जोगदंड, आत्माराम चौकट, शिवाजी चौखट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना लागू करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
